पिंपरी : खेड तालुक्यातील करंजविहीरे गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. फुटींग होलचे काम सुरू असताना ट्रॅक्टरच्या काॅम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यानंतर जिलेटिनचा स्फोट होऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना करंजविहीरे गावातील नवीन स्टोन क्रशर प्लांटवर शनिवारी २७ एप्रिल रोजी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली.
राजेश कुशवाह असं मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर रमेश मोतीलाल कोल (वय-३५, रा. जामूल तोला, ता. अमृत पाटन, जि. सतना, मध्य प्रदेश) आणि आलोक कोल हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी स्वप्नील बाबाजी कोळेकर, नीलेश सदाशिव कोळेकर, बाबाजी रामदास कोळेकर (तिघे रा. करंजविहीरे, ता. खेड), रवींद्र अरुण तोत्रे (रा. वडगाव पाटोळे, ता. खेड) या सशंयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील रवींद्र तोत्रे याला पोलिसांनी अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक किरण शिंदे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हे कॉम्प्रेसर ट्रॅक्टरने फुटींग होल घेण्याचे काम करतात. त्यांच्याकडे रमेश कोल, आलोक कोल आणि राजेश कुशवाह हे काम करत होते. संशयित आरोपींकडे जिलेटीन देखील होते. त्यांनी कामगारांना कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांच्याकडून सदोष कॉम्प्रेसरने फुटींग होलचे काम करून घेतले.
फुटींग होलचे काम सुरू असताना ट्रॅक्टरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यानंतर जिलेटीनचा देखील स्फोट झाला. यामध्ये कामगार राजेश कुशवाह यांचा मृत्यू झाला. तर आलोक कोल आणि रमेश कोल हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकणी गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीला अटक केली आहे. पुढील तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस करत आहेत.