पिंपरी : पुण्यात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत घराच्या अंगणात खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या डबक्यात पडून तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. १०) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडली. गणेश बालाजी मंजलवार (वय ३) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजलवार कुटुंबीय भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास चिमुरडा गणेश मित्रांसोबत अंगणात खेळत होता. त्यावेळी तोल गेल्याने गणेश डबक्यात पडला.
दरम्यान, गणेशच्या मित्रांनी त्याच्या आईला या घटनेची माहिती दिली. आईने पळत जाऊन गणेशला डबक्याबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास गाडे करत आहेत.