पनवेलः कामोठे सेक्टर-२१ मध्ये रस्त्यावर वाहने लावून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना वाहने बाजूला लावण्यास सांगितल्याचा रागातून १० ते १५ विक्रेत्यांनी या तरुणाला व त्याच्या सहकाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी व दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. कामोठे पोलिसांनी या प्ररकणी अनिल गोवारी व त्याच्या १० ते १५ सहकार्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कामोठे सेक्टर-२२ मध्ये राहणारा गणेश चव्हाण हा गत रविवारी सायंकाळी कामोठे सेक्टर- २१ मध्ये जेवण आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी आईक्रीम विक्रेता व भाजी विक्रेत्यांनी रस्त्यामध्ये आपली वाहने लावल्याने इतर वाहनांना अडचण होत असल्याचे गणेशच्या निदर्शनास आले. त्यामुळे गणेश चव्हाण याने त्या दोन्ही विक्रेत्यांना त्यांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने त्यांना त्यांची वाहने रस्त्याच्या बाजुला लावण्यास सांगितले.
त्यामुळे आईक्रीम व भाजी विक्रेत्याने गणेश चव्हाण याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे गणेश चव्हाण याने त्याचा सहकारी संग्राम अलदर याला फोन करुन त्याठिकाणी बोलावून घेतले. त्यामुळे संग्राम आणि विनय पांडे हे दोघे तेथे पोहोचले असता, १० ते १५ व्यक्तींनी गणेश चव्हाण याला मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यावर संग्राम अलदार हा त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडला असता, जमावाने त्याला देखील मारहाण केली.