IND vs ENG 1st T20I : भारताच्या गोलंदाजांची चमकदार गोलंदाजी आणि अभिषेक शर्माची तुफान फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या टी-२० सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंड संघाचा ७ विकेट्सने पराभव केला. अभिषेक शर्माने ३४ चेंडूत ७९ धावांची वादळी खेळी करत भारताला सहज विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने इंग्लंडच्या एकापेक्षा एक सरस वेगवान गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला आणि भारताला मोठा विजय मिळवून दिला.
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. इंग्लंडचा संघ २० षटकांत १३२ धावा करून सर्वबाद झाला. भारतीय संघाकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने ३ तर अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.
भारताच्या टी-२० संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या तिन्ही आघाड्यांवर क्षेत्रांमध्ये या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळवत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर जोस बटलरने एका टोकाकडून संघाचा डाव सावरला खरा पण त्याला इतर फलंदाजांकडून योग्य साथ मिळाली नाही.
बटलर आणि हॅरी ब्रुकने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. पण वरूण चक्रवर्तीने एकाच षटकात क्लीन बोल्ड करत २ विकेट्स घेत इंग्लंडच्या पुनरागमनाचे दरवाजे बंद केले. अर्शदीप वरूणनंतर भारताच्या इतर गोलंदाजांनी झटपट विकेट घेण्यात हातभार लावला. जोस बटलरने ४४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अशारितीने इंग्लंडच्या डावात भारताने पूर्णपणे आपला दबदबा कायम राखला.
टीम इंडियाच्या १३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामीची जोडी मैदानात उतरली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची वेगवान भागीदारी पाहायला मिळाली. सॅमसन २६ धावा करून बाद झाला, तर अभिषेकने एका टोकाकडून डाव सांभाळून वेगवान धावा करत इंग्लंडला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. अभिषेकच्या बॅटमधून ७९ धावांची शानदार खेळी पाहायला मिळाली, तर भारतीय संघाने हे लक्ष्य १२.५ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले.
संजू सॅमसनने २० चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह २६ धावा केल्या. तर अभिषेक शर्मान ३४ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ७९ धावा केल्या. तर कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र २ चेंडू खेळल्यानंतर खाते न उघडता बाद झाला. यानंतर तिलक वर्माेही १९ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले.