कोलकाता: इंग्लंडने पहिला टी-20 सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीसह भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा डाव 20 षटकांत 132 धावांत आटोपला. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने अर्धशतक झळकावले. त्याने 44 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. इंग्लंडचे केवळ तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. बटलरशिवाय इतर कोणताही फलंदाज प्रभाव पाडू शकला नाही.
या सामन्यासाठी भारताने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेइंग-11 मध्ये स्थान दिले नाही, मात्र अर्शदीप सिंगने जबाबदारी स्वीकारत पाहुण्या संघाला सुरुवातीला दोन धक्के देत भारताला चांगली सुरुवात करून दिली. यासह अर्शदीप आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले.