पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पार्टीच्या वतीने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंदाच्या ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे ते ४ मे दरम्यान “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातून काढण्यात येणाऱ्या मंगल कलश रथयात्रेचा शुभारंभ कोल्हापूर येथून सुरू झाला असून, येत्या मंगळवारी (दि. २९ एप्रिल) सायंकाळी पुणे शहरात येणाऱ्या या रथयात्रेचे स्वागत करण्यासाठीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.
हडपसर येथील साने गुरुजी भवन येथून कलश यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या वाड्यात त्यांना अभिवादन करून नंतर लालमहाल येथे आगमन होईल. तसेच शनिवारवाडा येथून ही केसरीवाड्यापर्यंत कलशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.