पुणे : मुलाच्या अकाली निधनाचे दु:ख बाजूला ठेऊन सासूने पुढाकार घेऊन सुनेचा दुसरा विवाह केल्याची घटना धायरी (पुणे) परिसरात घडली आहे. विधवा सुनेचा विवाह केल्यामुळे लायगुडे- काटे परिवाराने एक नवीन आदर्श निर्माण केला.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल लायगुडे याचा रश्मीबरोबर विवाह झाला होता. त्यांना एक सहा वर्षाची मुलगी आहे. विशाल लायगुडे यांचा सहा वर्षांपूर्वी कावीळसदृश आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर सासू छाया सोबत रश्मी आणि तिची मुलगी एकत्र राहत होत्या.
अवघ्या ३२ वर्षांच्या मुलाचे निधन झाल्यानंतर सासूने रश्मीला मुलीप्रमाणे सांभाळ केला. ऐन तारुण्यात मुलगा गमावल्याचे दु:ख असताना छाया यांना विधवा सुनेच्या भविष्याची चिंता लागली होती. पोटच्या मुलीप्रमाणे त्यांनी सून रश्मी हिचा सांभाळ केला. पुनर्विवाहासाठी तिचे मन वळविले. आणि अखेर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पुण्यात रश्मी यांचा विवाह नुकताच पार पडला.
दरम्यान, सासू-सुनेचे नातेदेखील प्रसंगी आई-मुलीच्या नात्यात रूपांतरित होऊ शकते. सर्वत्र भांडणे, कटकटी होत असतात. अशा घटनांना छेद देणारे प्रसंग समाजात घडत असतात. अशा परिस्थितीत सासूच आई बनून विधवा सुनेचे कन्यादान करते, हा क्षण खरोखरच स्तुत्य ठरत असतो. असाच एक विवाह सोहळा नुकताच पुण्यात झाला. सासूने सुनेचे कन्यादान करत आपल्या या कृतीतून आदर्श घालून दिला आहे.
याबाबत बोलताना सासू छाया लायगुडे म्हणाल्या कि, “पतीच्या निधनानंतर स्वतः विधवेचे दुःख सोसले आहे. सुनेच्या भविष्याचा विचार केला. तिच्या वाट्याला दुःख येऊ नये, या हेतूने मुलगा विशालचे निधन झाल्यानंतर सर्व नातेवाईकांच्या संमतीने तिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. तिचा विवाह करून कन्यादान केले. या विवाहासाठी धाकटा मुलगा विपुल व धाकटी सून भाविका यांच्यासह अन्य नातेवाईकांची साथ लाभली.’