यवत : खडकवासला कालवासह विविध सिंचन प्रकल्पांबाबत एशियन विकास बँकेच्या शिष्टमंडळ आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यामध्ये नुकतीच भेट झाली. यादरम्यान, खडकवासला कालवासह विविध सिंचन प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पावसाळी अधिवेशनामध्ये एशियन बँकेच्या सहकार्याने राज्य शासन खडकवासला कालवा ते फुरसुंगी, लोणी काळभोरपर्यंत सुमारे २८ किमी बंदनळी कालवा, खडकवासला उजवा कालवा, डावा कालवा, जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना आदींच्या दुरुस्ती, बांधकाम, विस्तार सुधारणा आदींसाठी सुमारे ३५०० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेणार असल्याचे घोषित केले होते.
या प्रकल्पाच्या संबंधित ठिकाणांच्या स्थळ पाहणीसाठी एशियन विकास बँकेचे शिष्टमंडळ पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, प्रकल्पासंबंधित विविध ठिकाणांना भेट देत आहेत. जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एशियन विकास बँकेच्या शिष्टमंडळासह आमदार राहुल कुल यांची भेट घेतली. एशियन बँकेच्या शिष्टमंडळामध्ये मेरी लहोस्टिस, ब्रँडो एंजेलिस, ख्रिस डनलॉप, एम. के. मोहंती, विकास गोयल, रायलदा सुसुलन, रँडल जोन्स, बर्नहार्ड स्टॅचरल, अलन क्लार्क यांचा सहभाग होता.
यावेळी शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी खडकवासला सिंचन प्रकल्पासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. यावेळी या प्रकल्पाद्वारे सदर सिंचन प्रकल्पांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अनेक कामे मार्गी लागणार त्याद्वारे सुमारे ३-४ टीएमसी पाण्याची बचत होणार असून, त्याचा फायदा हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे नमूद केले.
या प्रकल्पासाठी एशियन विकास बँकेच्या सहकार्याबद्दल शिष्टमंडळाचे आमदार राहुल कुल यांनी आभार मानले. यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्यासह योगेश सावंत, उपअभियंता सुहास साळुंके, सचिन पवार, शंकर बनकर आदी उपस्थित होते.