पुणे: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुणे न्यायालयामध्ये आज (दि. ३१) हजर झाले आहेत. न्यायालयाने जरांगे पाटील यांना २०१३ मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते पुणे न्यायालयासमोर हजर झाले आहेत.
दरम्यान या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, न्यायालयाच्या समोर सर्वजण समान असतात. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी आज न्यायालयात हजर झालो आहे. याविषयी अधिक बोलणे योग्य ठरणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने २०१३ मध्ये एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी पुणे न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कलम १५६(३) प्रमाणे कोथरूड पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळालेला होता. आता याच प्रकरणात त्यांना न्यायालयाने वॉरंट बजावले असल्याने ते न्यायालयात हजर झाले आहेत.