लोणी काळभोर, ता. 30 : पुणे दौंड लोहमार्गावरून भरधाव वेगाने चाललेल्या एका रेल्वेगाडीच्या खाली उडी मारून एका अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 26) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेत अनोळखी इसमचा चेंदामेंदा झाल्याने त्याची ओळख पटविण्याचे लोणी काळभोर पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून हातातील धाग्यावरून त्या मृतदेहाची ओळख अवघ्या दोन दिवसात पटविण्यात यश आले आहे.
नांगे बेद कुमार (वय 37 ,सध्या रा सदर मुळ रा. डहेलापुर, पैदाबाद, कन्नोज, उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर रेल्वे उड्डाणपूलाखाली एका इसमाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, मृतदेहाच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ए एफ एम सी हॉस्पीटल येथील शवागृहात ठेवला होता. तसेच त्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे लोणी काळभोर पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते.
पोलिसांना त्या अनोळखी मृतदेहजवळ केवळ फाटलेले कपडे, चप्पल व हातातील धागा असे पुरावे सापडले होते. पोलिसांनी लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी परिसर पिंजून काढला. अनोळखी इसमची ओळख पटविण्यासाठी पोलिस घर टू घर, दुकाने, नर्सरी यांच्याकडे जाऊन जिकरीने प्रयत्न करीत होते. तेव्हा त्या अनोळखी इसमाच्या हातातील धागा आशिष कश्यप या 18 वर्षाच्या मुलाने ओळखला. आणि त्याचे चुलते नांगे कुमार यांच्या हातातील असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नांगे कुमार याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना दाखविला. त्यानंतर नातेवाइकांनी हा मृतदेह नांगे कुमार याचाच असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी कुमारचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे स्वाधीन केला. आशा प्रकारे अनोळखी इसमाची ओळख लोणी काळभोर पोलिसांना पटवली.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी नांगे कुमार याच्या आत्महत्येबाबत अधिक चौकशी केली असता, कुमार याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याची बायको मागील 10 वर्षापासुन माहेरी राहत आहे. कुमार हा आठ दिवसांपूर्वी कुंजीरवाडी येथील नातेवाईकांकडे आला होता. मात्र तो खूप मानसिक तणावाखाली होता. चौकातुन जावुन येतो असे सांगुन तो शनिवारी घरातून गेला होता. त्याने याच तणावाखाली येऊन दारूच्या नशेत आत्महत्या केली असावी. अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे येत आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार विजय जाधव, महेश करे, दादा हजारे, तेजस जगदाळे यांनी कौशल्यपूर्वक तपास करून मृतदेहाची दोन दिवसात ओळख पटविली आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.