राहुलकुमार अवचट
Yavat News : केडगाव : खुटबाव रस्त्यावरील केडगाव येथील रेल्वे पुलाखालील मोरीची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने केडगाव ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे.
केडगाव ग्रामपंचायतीकडे मागणी
केडगाव व खुटबाव रस्त्यावरील केडगावजवळ असलेल्या रेल्वे मोरीची दुरवस्था झालेली असून, अनेक वर्षे गावकऱ्यांना शेतीसाठी व कामासाठी धोकादायक पद्धतीने असुरक्षित मार्गाने जावे लागत आहे. याठिकाणी अनेकदा पाणी साठत असून, पाण्याखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने लहान मुले, वयोवृद्ध, महिलांना संकटांना सामोर जावे लागत आहे.
केडगाव ही मोठी बाजारपेठ आहे. तालुक्यातील उत्तर भागातून या रस्त्याने नेहमीच वर्दळ असते. येथील रेल्वे पुलाखाली बारा महिने सांडपाणी साचलेले असते. (Yavat News) पावसाळ्यात या ठिकाणी पाण्याचा लोंढा तयार होतो. शेजारील ओढ्यातील पाणी मोरीतून रस्त्यावर येते. अशा वेळी शाळेत जाणारी लहान मुले, शेतकरी, महिला, व्यापारी, वयोवृद्ध, आजारी माणसांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. याठिकाणी सांडपाणी निवारणासाठी व्यवस्था तयार करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत उपाययोजना न केल्यास, न्यायिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
या वेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे दौंड तालुका अध्यक्ष नामदेव होले, सचिव ऋषिकेश बंदीष्टी, संघटक भाऊसाहेब दूरेकर, महसूल प्रमुख शेलार, बांधकाम प्रमुख अमोल भागवत यांसह पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.