केडगाव / संदीप टूले : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल बाजले असून, सार्वत्रिक निवडणुका ५ नोव्हेंबरला होणार आहेत. राज्यातील सुमारे २३५९ ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत. त्यातील दौंड तालुक्यातील अनेक बहुचर्चित गावांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यात दौंड तालुक्यातील मिनी शहर म्हणून केडगाव ग्रामपंचायत ओळखली जाते. या ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने तालुका पातळीचे नेते आता सक्रिय झाले असून, पॅनल बांधणीला लगेचच सुरुवात झाली आहे.
सरपंचपदाचे आरक्षण हे खुल्या गटासाठी पुरुष उमेदवारासाठी असल्यामुळे ही निवडणूक खूपच चुरशीची होणार आहे. एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या १७ असून, गाव पातळीवरील दोन्हींही गटांनी गेली ६ महिने छुप्या पद्धतीने तयारी सुरु केली आहे. केडगाव ग्रामपंचायतीचे एकूण मतदार १२९७१ असून, एकूण सहा वॉर्ड आहेत.
वॉर्डनिहाय एकूण मतदार
१) देशमुख मळा – एकूण १९३८, पुरुष १०७१, महिला ८६७.
२) पाटील निंबाळकर वस्ती – एकूण २०४०
३) हंडाळवाडी वार्ड – एकूण १४१२, पुरुष ७४०, महिला ६७०.
४) धुमळीचामळा – एकूण २०८८, पुरुष ११०८, महिला ९८०.
५) केडगाव स्टेशन वार्ड – एकूण ३४६८, पुरुष १७१९, महिला १७४९.
६) केडगाव गावठाण – एकूण २०२५, पुरुष १०२९ महिला ९९५ इतर १
आजपासून आचारसंहिता लागू
केडगाव ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत करावे लागणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहेत. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे.
ज्ञानोबा काळे यांनी प्रशासक म्हणून पाहिले काम
२३ जून २०२३ रोजी केडगाव ग्रामपंचायतीचा कालावधी संपला होता. त्यानुसार, गावात सरपंच अथवा सदस्य कार्यरत नव्हते. तेव्हापासून ज्ञानोबा काळे हे गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.