प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून मोठी बातमी समोर येत आहे. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामळं आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली आहे.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मौनी अमावस्येनिमित्त होणाऱ्या अमृत स्नानाचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आज कोणत्याही आखाड्याकडून अमृत स्नान होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. आखाड्यांनी त्यांच्या मिरवणुकांना शिबिरांत माघारी बोलावण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती महंत रवींद्र पुरी यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील दुसऱ्या अमृत स्नानाच्या म्हणजेच मौनी अमावस्येच्या पूर्वी चेंगराचेंगरीची घटना घडली. रात्री 1 वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे. जिथं लोक झोपली होती तिथं त्या ठिकाणी मागील बाजूनं अनेक लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. त्याचवेळी लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार 111 ते 122 पोल नंबरमध्ये चेंगराचेंगरी झाली असून सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं. दुसऱ्या घाटावर स्नान करायला ते तयार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं एकाच ठिकाणी गर्दी वाढत गेली आणि चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. यानंतर पळापळ झाली. या घटनेतील जखमींना स्वरुप रानी नेहरु रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर जिथं चेंगराचेंगरीची घटना घडली आहे त्या संगम घाटावर कोणी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. घटनेच्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्राथमिक माहितीनुसार 50 ते 80 लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, प्रशासनानं अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही.







