शिरूर: शिरूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने अंदाजे 32 हजार रुपयांच्या विद्युत साहित्याची चोरी केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानसिंग जगदिश नेवसे (वय 35, रा.छत्रपती कॉलनी-शिरूर, ता.शिरूर, जि.पुणे ) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित घटना सोमवारी 5 मे रोजी मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
संबंधित घटनेची सविस्तर माहिती अशी की, रविवारी 4 मे रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे कार्यालय बंद करून कार्यालयातील उपस्थित सर्व कर्मचारी व अधिकारी घरी निघून गेले. मात्र, ऑफिसच्या बाहेर ठेवलेला अल्युनियम कंडक्टर आणि 120 एम.एम.केबल असा एकूण अंदाजे 32 हजार रुपयांचा माल कार्यालय बंद असल्याचा फायदा घेऊन सोमवारी 5 मे रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाने मोटारसायकलसह कार्यालय आवारात प्रवेश करून कार्यालय परिसरात पार्किंग केलेल्या मोटारसायकलला साहित्य बांधून ते चोरून नेले.
ही घटना सोमवारी सकाळी (ता. 05) साडेनऊ वाजता वीज वितरण कंपनीचे कार्यालय उघडल्यानंतर उघडकीस आली. त्यानंतर सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर बारवकर यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये 5 मे रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी इसम मोटारसायकलसह कार्यालय आवारात प्रवेश करताना दिसत आहे. त्यानेच कार्यालय परिसरात पार्किंग केलेल्या मोटारसायकलला साहित्य बांधून ते चोरून नेले. त्यामुळे शिरूर पोलिस ठाण्यात संबंधित अनोळखी चोरट्या इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत.