उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेऊन घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी (ता. 29) रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन गावच्या हद्दीत रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर 219/7-5 च्याजवळ पुणे बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शरद शहाजी वाळके (वय – 38, व्यवसाय- नोकरी रा. सार्थक रेसिडेन्सी फ्लॅट नंबर 204 जे जे नगर केसनंद रोड वाघोली, ता. हवेली जि. पुणे मूळ रा. मखरेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी उरूळी कांचन गावच्या हद्दीत रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नं 219/7-5 च्या जवळ पुणे बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी अज्ञाताने रेल्वे गाडी, पटरी आणि रेल्वेमधील प्रवाशांच्या जीवितास नुकसान व धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रिया गोल्ड कंपनीचा लहान आकाराचा (3900 किं ग्रॅम वजनाचा) गॅस सिलेंडर भरलेल्या अवस्थेत ठेवलेला मिळून आला.
दरम्यान, शरद शहाजी वाळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.