पुणे : पुण्यातून एक चोरीची बातमी समोर आली आहे. लेडीज शॉपीमध्ये ब्लाऊज पीस, अंगठी खरेदी करण्याचा बहाणा करुन दुकानातील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पिंपरी सांडस येथील ३५ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. रोहन सतिश जाधव (वय-२८, रा. द्वारका बिल्डिंग, हरपळेनगर, फुरसुंगी रोड, हडपसर) असे या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी सांडस येथील तृष्णा लेडीज शॉपी हे दुकान आहे. या दुकानात फिर्यादी असताना २८ नोव्हेंबर रोजी एक चोरटा आला. त्याने ब्लाऊज पीस तसेच अंगठी खरेदी करायची आहे असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी त्याला वस्तू दाखवित होत्या. त्यावेळी त्याने काऊंटरवर येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील तब्बल ४० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून चोरुन नेले होते.
या प्रकरणी पोलिसांनी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलिस अंमलदार यांनी पिंपरी सांडस, कोरेगाव भिमा, लोणीकंद, वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी, हडपसर, फुरसुंगी, मगरपट्टा, घोरपडी, कल्याणीनगर, येरवडा परिसरातील आरोपीच्या पळून जाण्याच्या मार्गावरील एकूण ८० ते १०० सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे.
या सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपीच्या वर्णनावरुन व आरोपीबाबत बातमीदाराकडून माहिती मिळवून रोहन जाधव याला येरवडा परिसरातील कॉमर्स झोन येथे मोटारसायकलसह पकडण्यात आले आहे. दुकानातून जबरी चोरी केल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.