पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरुडमध्ये अज्ञातांनी तीन गोळ्या झाडून भरदिवसा हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, कोथरूड परिसरात दहशत असणाऱ्या अजून एका गुंडाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उत आला आहे.
कोथरुडमध्ये दहशत असलेला गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याने नुकतीच पार्थ पवार यांची भेट घेतली. मारणे-पवार भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गज्या मारणे याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारणे टोळीची कोथरुड, तसेच शहरात दहशत आहे.
मारणेची पत्नी जयश्री या मनसेच्या नगरसेविका होत्या. मारणेने पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मारणे आणि त्याची पत्नी जयश्री दोघेही या भेटप्रसंगी उपस्थित होते. त्यांच्यासोबत दीपक मानकर, माजी नगरसेवक दत्ता धनकवडे, प्रदीप देशमुख देखील याप्रसंगी उपस्थित असल्याचे दिसत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर गज्या मारणेची राजकीय भेट कोथरुडमधील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत देत आहे.