Rohit sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. पर्थमध्ये खेळवण्यात आलेला पहिला सामना भारताने आपल्या नावे केला आहे. पुढची टेस्ट ६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. दरम्यान या दुसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाने गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. इतकंच नाही तर कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन संसदेत भाषण करत सर्वांची मनं जिंकून घटली आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत रोहितने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मजबूत संबंधांचं कौतुक केलं आणि सध्या सुरु असलेल्या दौऱ्यात सिरीज जिंकण्याची गती कायम ठेवण्याचंही म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित शर्माने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांबाबत संसदेत बोलताना म्हटलं की, ‘आपलं नातं फार जुनं आहे, मग ते खेळाचं असो किंवा व्यवसायाचं. गेल्या अनेक वर्षांपासून आपण क्रिकेट खेळण्यासाठी आणि देशातील विविध संस्कृतींचा आनंद घेण्यासाठी या भागात आलो आहोत. साहजिकच, ऑस्ट्रेलिया चॅलेंजिंग आहे. खेळाडूंनी या ठिकाणी येऊन क्रिकेट खेळणे आव्हानात्मक आहे, कारण इथल्या लोकांमध्ये जोश आहे. त्यामुळे इथे येऊन क्रिकेट खेळणे हे आमच्यासाठी नेहमीच मोठे आव्हान असतं.
रोहित शर्मा पुढे म्हणाला की , ‘सुरु असलेल्या सिरीजमधील पहिल्या सामन्यात आम्हाला यश मिळालं आणि तीच गती कायम ठेवायची आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियन संस्कृतीचा आनंद घ्यायचा आहे. शहरांची विविधता एक वेगळीच अनुभूती देते. या सिरीजच्या निमित्ताने येत्या काही आठवड्यांत ऑस्ट्रेलियन लोकांचं तसंच भारतीय चाहत्यांचं मनोरंजन आम्ही करू शकू अशी आशा आहे. असंही रोहित म्हणाला.
6 डिसेंबरला होणाऱ्या पिंक बॉलच्या टेस्टपूर्वी रोहित म्हणाला, ‘आम्ही क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहोत आणि या देशाचा आनंदही लुटणार आहोत. हे एक अद्भुत ठिकाण आहे, याची सर्वांना कल्पना आहे. येत्या महिन्यात आमच्याकडून खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद सर. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.