लोणी काळभोर : येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात पर्यावरण शास्त्रातील प्रतिकृती बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणशास्त्रातील पर्यावरण विषयक प्रतिकृती तयार केल्या होत्या.
यामध्ये वाफेचे इंजिन, वायू प्रदूषण, जलप्रदूषण, चांद्रयान, पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर याची प्रतिकृती, साखर कारखान्याची प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. याचे उद्घाटन राजेंद्र डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर, प्रा. गणेश हजारे, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. पर्यावरणशास्त्र व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. पी. एम. खनुजा यांच्या मार्गदर्शनाखाली मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत.
दरम्यान, पर्यावरण शास्त्रातील प्रतिकृती बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक राजवीर विकास कदम, दुसरा क्रमांक अश्विनी काळभोर, तिसरा क्रमांक प्रणाली खाटमोडे यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीला देण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.