पुणे : राज्यातील नोटरी वकिलांची मुलाखत होऊन एक वर्ष झाले, तरी नोटरी वकिलांची यादी जाहीर होत नसल्यामुळे, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यादी लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. काही कायदेशीर तांत्रिक अडचणींमुळे यादी जाहीर होण्यास विलंब झाला. मात्र, लवकरात लवकर यादी जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन मेघवाल यांनी दिले.
कायद्याचे रक्षण करणाऱ्या वकिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत या वेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. राहुरी येथे अॅड. आढाव दाम्पत्याचा झालेल्या निर्घृण खूनाचा या वेळी निषेध व्यक्त करण्यात आला. असेच खून होत राहिले तर न्यायालयात न्याय मिळविण्यासाठी उभे राहणे देखील कठीण होईल, असे सांगून वकील संरक्षण कायद्याच्या मागणीचे निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आले.
या वेळी नोटरी असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनावर बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप, नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. आतिश लांडगे, पिंपरी-चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, नोटरी असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली यांच्या स्वाक्षरी आहेत.
या वेळी खासदार अमर साबळे यांनी वारंवार वकीलांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. वकील संरक्षण कायदा हा केंद्रीय कायदा करून संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.