-पोपट पाचंगे
कारेगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात जिंतूर – सेलू (जि. परभणी) या विधानसभा मतदारसंघामधून सलग दुसऱ्यांदा भाजपकडून आमदार झालेल्या मेघना दिपक साकोरे -बोर्डीकर यांची नुकतीच राज्य मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. यामुळे शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र केंदूर गावची सून राज्यमंत्री बनली असल्याने बोर्डीकर यांच्यावर शिरुर तालुक्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राज्य मंत्रीमंडळाचा रविवार, (दि. 15) हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विस्तार झाला. त्यात महायुती सरकारकडून चार महिलांना संधी देण्यात आली. यामध्ये भाजपकडून जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या मेघना बोर्डीकर साकोरे यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. राज्यमंत्री पदी संधी मिळालेल्या बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांनी काँग्रेसकडून चार वेळा आमदारकी मिळविली.
शिरुर तालुक्यातील केंदूर येथील आयपीएस अधिकारी दिपक साकोरे यांच्याशी राज्यमंत्री बोर्डीकर यांचा विवाह झाला. बोर्डीकर यांनी पुण्यातील डी. वाय.विद्यापीठामधून बीएस्सी कॉम्प्युटर आणि इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पदव्युतर पदवी घेतली. बोर्डीकर ह्या वयाच्या 28 व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य बनल्या. ते आता राज्यमंत्रीपदी, असा त्यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास राहिला आहे. विशेष म्हणजे बोर्डीकर ह्या शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे यांच्या जवळच्या नातलग आहेत.
दरम्यान, यापूर्वी केंदूर येथील बापूसाहेब थिटे यांनी राज्य मंत्रीमंडळात गृह राज्यमंत्री म्हणून काम पाहिले, त्यानंतर आता जवळपास 34 वर्षानंतर केंदूरच्या सून असलेल्या बोर्डीकर यांचा राज्यमंत्री मंत्री मंडळात समावेश झाल्याने केंदूर व परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.