पुणे : पुण्यातील शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार याचं अपहरण करुन त्याचे विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी ऋषिराज पवार यांनी शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. या सर्व प्रकरणावर आता आमदार अशोक पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दुर्दैवी.. दुःखद.. वेदनादायी.. घृणास्पद.. निंदनीय..’ या चार शब्दांचा कॅप्शनमध्ये उल्लेख करत अशोक पवार यांनी त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
घडलेली घटना वेदनादायी..
शिरुरचे आमदार अशोक पवार यांनी त्यांच्या मुलासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, आज दुर्दैवी घटना घडली, घृणास्पद म्हणजे विरोधी माणसं कुठल्या थरापर्यंत जातात. आज माझ्या मुलाला मोटारसायकलवर असताना एकानं प्रचार करण्यासाठी नेलं, जवळच्या वस्तीत नेलं, तिथं गेल्यावर कोंडलं, त्याचा गळा पट्टीनं की फडक्यानं आवळण्यात आला. त्याला सांगितलं तू कपडे काढ, एका महिलेला विवस्त्र करुन अत्यंत घृणास्पद प्रकार केला. आमच्या जीवनामध्ये आम्ही जे चांगलं वागतो, समाजाशी एकरुप होतो, पण मनाला वेदना झाल्या, कुठल्या थराला जाणार आहेत ही लोकं? अशी भूमिका अशोक पवार यांनी मांडली.
ते म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा..
काही लोकं भेटायला आले, ते म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय आहे. खरं म्हणजे आमच्या सारख्याचं मन एकदम बेचैन झालं आहे. लोकशाहीत निवडणूक लोकशाही पद्धतीनं तुम्ही लढा. असे घृणास्पद प्रकार करुन आमच्या कुटुंबाला वेठीस धरायचं आहे का?, अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे. म्हणजे काळ यांना माफ करणार नाही. आता पोलीस खात्याला मी विनंती केली याची बारकाईनं चौकशी करा, याचा कोण सूत्रधार आहे हे शोधलं पाहिजे, समाज यांना माफ करणार नाही. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना की ज्यांना कुणी याच्यामध्ये कृत्य करण्यास भाग पाडलं असेल, तो खरा माणूस शोधणं पोलीस खात्याचं लक्ष्य असलं पाहिजे. यांना माफ केलं नाही पाहिजे. कुटुंबाला बदनाम करणं दु:खद अशी घटना आहे, असं अशोक पवार यांनी म्हटलं आहे.
घटना गंभीर आणि संतापजनक : खासदार अमोल कोल्हे
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, आमदार अशोकबापू पवार यांच्या मुलाच्या बाबतीत घडलेली घटना गंभीर आणि संतापजनक आहे. एका लोकप्रतिनिधीच्या मुलाचे अपहरण होते, त्याला विवस्त्र करुन मारहाण करण्यात येते आणि त्यानंतर त्याचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडतो. हा एकंदर प्रकार महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या कशा चिंध्या उडाल्या आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसे सपशेल फेल ठरले, याचे प्रत्यंतर देणारा आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटले.