पिंपरी : मोठ्या सिलिंडरमधून धोकादायकपणे छोट्या सिलिंडरमध्ये गॅस चोरी करणाऱ्या गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी ७७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चऱ्होली फाटा येथे १३ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. पोलिस हवालदार विजय रंगनाथ नलगे (वय ३८) यांनी या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फियार्द दिली. त्यानुसार, पांडूरंग दयानंद खताळ (वय २१, रा. योगेश रसाळ यांची खोली, चऱ्होली फाटा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खताळ हा बेकायदेशीररित्या घरगुती वापराच्या मोठ्या सिलिंडरमधून चार किलोच्या छोट्या सिलिंडरमध्ये गॅस रिफिलिंग करत होता. हे काम करताना त्याने सुरक्षीततेची कोणतीही काळजी घेतली नाही. घरगुती वापराचा गॅस हा अतिज्वलनशिल पदार्थ असल्याचे माहित असूनही त्याने कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना केली नव्हती. तसेच गॅस चोरी करून तो छोटे गॅस चढ्यादराने विकत होता. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून गॅस टाक्या, गॅस रिफिलिंगसाठी लागणारे साहित्य असा ७७ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. दिघी पोलिस तपास करत आहेत.