लोणी काळभोर, ता. 29: हवेलीचे वैभव असलेला थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी पेठच्या सरपंच शोभा नामदेव चौधरी यांनी 5 लाखांची आर्थिक मदत केली आहे. महिला सरपंच चौधरी यांनी केलेल्या या मदतीचे हवेली तालुक्यात कौतुक होत आहे.
आर्थिक गर्तेत सापडलेला “यशवंत” हा मागील चौदा वर्षापासुन बंद असुन, कारखान्यासमोरील आव्हाने खूप मोठे आहेत. “यशवंत” कारखाना मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या ताब्यात असून कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकारची फार मोठी मदत लागणार आहे. सरकारच्या मदतीशिवाय कारखाना सुरू होण्याची अजिबात शक्यता नाही. कारखान्यावर 149 कोटी रुपये कर्ज आहे. तर दुसरीकडे वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) केल्यावर हे कर्ज कमी होऊ शकते. मात्र, ओटीएस करायला पैसे आणायचे कुठून हा मोठा प्रश्न आहे.
कारखान्याची हीच खरी गरज ओळखून बँकेचे ओटीएस करण्याकरिता पेठच्या सरपंच शोभा चौधरी यांनी पाच लाखांची मदत केली आहे. आणि हा मदतीचा चेक शोभा चौधरी यांनी त्यांच्या श्री मंगलमूर्ती डेव्हलपर्स तर्फे दिला आहे. हा धनादेश शोभा चौधरी यांचा मुलगा योगेश यांनी कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्याकडे सुपूर्त केला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक प्रशांत काळभोर, प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे व कारखान्याचे संचालक सचिन काळभोर, विजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, पेठच्या सरपंच शोभा चौधरी यांनी बँकेचे ओटीएस करण्यासाठी 5 लाखांची मदत करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या मदतीमुळे बँकेचे ओटीएस साठी मदत नक्की होणार आहे. हे मात्र खरे आहे. त्यामुळे हवेलीचे वैभव दानशूर नागरिकांच्या व शासनाच्या मदतीने लवकर चालू होण्याची शक्यता आहे.