Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | सासवड, (पुणे) : किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा सोहळा यंदा प्रथमच शासनस्तरावर आयोजित केला जाणार आहे. पुरंदर किल्ल्यावर होणार्या भव्य सोहळ्याला यंदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्यासह संभाजी ब्रिगेड तसेच पुरंदर प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी दिली आहे.
यादव म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज जयंती ही किल्ले शिवनेरीवर साजर्या होणार्या शिवजयंतीच्या धर्तीवर शासनाने साजरी करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या या मागणीला मान्यता देत या वर्षीपासूनच त्याची सुरवात करू, असे जाहीर केले. पुरंदर-हवेलीसह राज्यभरातील शंभूप्रेमींनीदेखील यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.
शिवतारे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील कार्यवाही करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार या वर्षीपासून शासकीय सोहळा होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला होता.
संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य सांभाळताना मराठी साम्राज्यात मोठी वाढदेखील केली. त्यांचे बलिदान हा मराठी माणसाच्या अंत:करणातील एक हळवा भाग बनला आहे. त्यांना मानवंदना देण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या वेळी यादव यांनी केले.