चाकण, (पुणे ): चाकण औद्योगिक वसाहत आणि परिसरात विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीच्या चाकण एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीकडून ३४० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा, पट्ट्या व पाच लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी, पाच दुचाकी असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रमेश उर्फ राहुल बाळू पडवळ (वय -27), सुनील उर्फ सैराट शिवाजी गावडे ( वय -21, रा. दोघेही, निमगाव दावडी, ता. खेड, जि. पुणे ), सुनील सुरेश गावडे (वय -23), रवींद्र सुरेश गावडे (वय -23, दोघेही रा. खडकी पिंपळगाव, ता. आंबेगाव), उस्मान बिलाल अब्दुल हरेरा (वय -20, रा. भांबोली ता. खेड), कार्तिक नामदेव पवार (वय- 25,रा. राक्षेवाडी ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीत, तसेच महाळुंगे, चाकण परिसरात गेल्या काही दिवसांपासून विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारा व पट्ट्या चोरीला जात होत्या. चाकण एमआयडीसी पोलिसांचे पथक गस्त घालीत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारा चोरल्याबाबत विचारपूस केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक तपास केला असता केलेल्या गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तार व पट्ट्या आणि रोहित्र खोलण्यासाठी वापरलेले साहित्य, गुन्ह्यात वापरलेली वाहने, असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यातील रमेश पडवळ याच्यावर नगर, पुणे जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात चोरीचे 16 गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुनील उर्फ सैराट शिवाजी गावडे याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलिस अंमलदार राजू कोणकेरी, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, अमोल बोराटे, प्रकाश चाफळे, किशोर सांगळे, संतोष काळे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर, अमोल माटे, मंगेश कदम, शरद खैरे, राजू जाधव यांनी केली आहे.