शिरूर: शिरूर (जि.पुणे) येथील व्यावसायिकाची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीच्या विरोधात शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिपक भिमराव बारवकर, सारिका दिपक बारवकर (दोघेही रा.ओयासीस सोसायटी,रामलिंग रोड शिरूर,ता. शिरूर,जि.पुणे) या पती-पत्नीच्या विरोधात शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाआहे. राजेंद्र अशोक बारगुजे (वय४९, रा.बाबुरावनगर-शिरूर,ता.शिरूर, जि.पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी राजेंद्र बारगुजे यांनी त्यांचे ओळखीचे दिपक बारवकर व सारिका बारवकर या पती-पत्नीला एक ट्रक घेण्यासाठी मध्यस्थी करण्यास सांगितले होते. त्यासाठी राजेंद्र बारगुजे यांनी त्यांच्या पायल सर्विस सेंटर या गाड्या खरेदी विक्री करणाऱ्या फर्मच्या माध्यमातून एका फायनान्स कंपनीकडून १५ लाख रुपयांचे कर्ज देखील काढले होते. कर्ज काढलेले १५ लाख रुपये बारगुजे यांनी बारवकर पती-पत्नी यांच्या वेदांत मोटर्सच्या बँक खात्यावर जमा केले. परंतू, हे पैसे ज्या व्यक्तीकडून ट्रक घ्यायचा होता त्या ट्रकच्या मालकाला म्हणजेच मिनीनाथ बाळू इरोळे, किसन जयवंत नरवडे यांना न देता दिपक बारवकर आणि त्यांच्या पत्नी सारिका बारवकर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरले असा आरोप बारगुजे यांनी तक्रारीमध्ये केला आहे.
दरम्यान राजेंद्र बारगुजे यांनी दिपक बारवकर व त्यांच्या पत्नीकडे पैशांची वारंवार मागणी करूनही त्यांना बारवकर दांपत्याकडून पैसे परत मिळाले नाहीत. उलट बारगुजे यांना बारवकर दांपत्याने उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच शिवीगाळ केली. इतकेच नव्हे, तर आरोपी दिपक बारवकर यांनी राजेंद्र बारगुजे यांना सावकारीच्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे बारवकर पती-पत्नीने विश्वासघात करून राजेंद्र बारगुजे यांची फसवणूक केली व त्यानंतर नोटरी करून देऊन पैसे देतो म्हणून बारवकर पती-पत्नी यांनी बारगुजे यांना सांगितले. मात्र, अद्यापपर्यंत पैसे दिले नाहीत. त्यामुळे बारवकर पती-पत्नी यांच्या विरोधात बारगुजे यांनी फिर्याद दाखल केली असून, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पुढील तपास करीत आहेत.