लोणी काळभोर, ता. 22 : बेबी कॅनॉलच्या पाण्यात अंदाजे 30 ते 36 वयोगटातील विवाहित महिलेचा मृतदेह वाहत जात असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. तरडे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बनकर मळा परिसरात शुक्रवारी (ता. 21) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी नागरिकांना केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरडे येथील कॅनॉलच्या पाण्यामध्ये महिला वाहून जात असल्याचे परिसरात राहत असलेल्या नागरिकांना दिसून आले. तात्काळ नागरिकांनी लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस अंमलदार प्रशांत सुतार, बोरावके व उरुळी कांचन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने वाहत चाललेल्या महिलेला पाण्याच्या बाहेर काढले. महिलेला उपचारासाठी लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वानवडी येथील एएफएमसी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महिलेची ओळख न पटल्यामुळे तिचा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. अशी माहितीही यावेळी पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी दिली.
पोलिसांशी संपर्क साधावा
सदर महिलेचे वय अंदाजे 30 ते 36 वर्ष असून चेहरा गोल, रंग गोरा, बांधा अंगाने मजबूत, उंची पाच फूट तीन इंच, अंगात निळ्या रंगाचा सलवार व पांढऱ्या रंगाची प्लाझा परिधान केली आहे. तर गळ्यामध्ये मंगळसूत्र, कानामध्ये रिंग, नाकामध्ये चमकी, हातात बांगड्या, पायामध्ये जोडवी घातलेली आहे. तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर c (सी) आकारामध्ये गोंदलेली डिझाईन आहे. अशा वर्णनाच्या महिलेची माहिती असल्यास नागरिकांनी लोणी काळभोर पोलीस अथवा पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार यांच्या 9421444455 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.