पुणे: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांची प्रकृती बिघडली असल्याची बातमी समोर येत आहे. त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे शरद पवार यांनी त्यांचे पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे, त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे पवारांनी आपले पुढच्या चार दिवसांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि दुसरा राष्ट्रवादी अजित पवार गट असे पक्षात फुट पडून दोन पक्ष झाल्यानंतर राष्ट्रवादीमधील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता.
तरीदेखील तुतारी या नव्या चिन्हावर निवडणूक लढवून शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटला तसेच महायुतीला मोठा धक्का दिला होता. शरदपवारांचा करिश्मा बारामतीमध्ये देखील दिसून आला होता. लोकसभेत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता तर सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.
आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय खेचून आणण्यासाठी पवार मैदानात उतरले आहेत
त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन करत, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये परत विजय खेचून आणण्याच्या उद्देशाने शरद पवार मैदानात उतरले होते. त्यांनी पुन्हा एकदा राज्यभरात दौऱ्याला सुरुवात केली होती. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांचे दौरे सुरूच आहेत. मात्र आज अचानक पवारांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांचे पुढच्या चार दिवसांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. अशी माहिती समोर येत आहे.