विशाल कदम
लोणी काळभोर, (पुणे) : डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वच क्षेत्रात त्याचा फटका बसत आहे. शेती व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. डिझेलचे दर वाढल्याने शेतीच्या मशागतीचे महत्त्वाचे साधन असणारे ट्रॅक्टरच्या मशागतीचे दरही वाढले. त्यामुळे पिकांसाठी होणारा खर्च आणि शेतमालाला मिळणारा बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे.
तालुक्यात बैलांची संख्या कमी झाल्यामुळे मशागतीसाठी बैलजोडी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरद्वारे शेतातली कामे करावी लागतात. अशातच इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असून याचा परिणाम नांगरणीच्या भावावर होत आहे. आता पिकांची काढणी झाली असून, शेतकरी नांगरणी करण्यासाठी धावपळ करत आहेत. अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना दिवसेंदिवस शेती करणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग देखील मेटाकुटीला आला आहे.
उत्पन्नाऐवजी मशागत, पिकांचा खर्च पाहता तोटा सहन करावा लागत आहे. डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. इंधन भाववाढ पाहता नांगरणीचेदेखील भाव वाढले आहेत. शेती मशागतीचे भाव दिवसेंदिवस वाढत असून, शेती करणे कठीण होत आहे. शेती विकून दुसरा कामधंदा करावा अशी मनस्थिती शेतक-यांची झाली आहे.
अन् शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टर
पूर्वी बैलांच्या मदतीने शेतातील नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी अशी सर्व कामे केली जायची. यामध्ये बैलांना खाण्यासाठी लागणारा चारा वगळता कोणताही खर्च शेतकऱ्यांना येत नव्हता. हा चारा शेतक-याच्या शेतात उपलब्ध होत असे. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांनी शेतातील कामे व्हायची. प्रत्येक शेतकरी आपल्या खुंट्याला बैल ठेवत असे. बैलांची जास्त संख्या असेल तर शेतकरी मोठा समजला जायचा आणि बैल नसेल तर तो शेतकरी नाही, असे समीकरण तयार झाले होते. बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण आले अन् शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टर घुसला.
मागील दहा वीस वर्षांत शेतीत आमूलाग्र बदल झाला. चार दिवसांची कामे एका तासात व्हायला लागली, एक पीक काढले की अवघ्या एक दिवसात मशागत करून दुसरे पीक उभे राहील अशी साधने निर्माण झाली. नांगरणी, कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक करणे, रोटाव्हेटर फिरवून गवत कापणे अशी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचला, अंग मेहनत वाचली मात्र शेतीसाठी लागणारा खर्च वाढला.
डिझेलवरील कर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे
आज डिझेलचे दर गगनाला भिडले आणि व्यवसाय करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी कामांचे दर वाढवले, डिझेल महाग झाल्यामुळे येणारा पैसा त्यात खर्च होत असल्यामुळे चार पैसे शिल्लक रहावे म्हणून मशागतीचे दर वाढले आणि पर्यायाने शेतीचे उत्पादन आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागली आहे.
धावपळीच्या युगात शेतीची कामे लवकर व्हावी यासाठी ट्रॅक्टरला अवजारे जोडून शेतीची कामे केली जातात. ट्रॅक्टरची मशागत शेतकऱ्यांना आज परवडणारी नसली तरी काळानुरूप बैलांच्या मदतीने शेती करणे आज शेतक-याला शक्य नाही. यासाठी शेतीला पुरविण्यात येणाऱ्या डिझेलवरील कर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
सद्य:स्थितीतील शेती मशागतीचे दर (प्रती एकर)
- नांगरणी – ४००० रु,
- रोटाव्हेटर मारणे – ३५०० रु,
- एकेरी फणणी – १२५० रुपये,
- दुहेरी फणणे – २५०० रु,
- वाफे तयार करणे – १२०० रु,
- सरी पाडणे – २५०० रु,
- पेरणी – २४०० रु,
दरम्यान, सध्या शेतकरी नांगरणीच्या कामात व्यस्त आहेत. पूर्वी दिवसा बैलजोडीने नांगरणी होत असे. त्यावेळी पक्षी शेतातील कीड खाऊन नियंत्रणात आणायचे. आता रात्री-अपरात्री ट्रॅक्टरच्या माध्यमातून नांगरणी केल्यामुळे कीड नियंत्रणात येत नाही. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी दिवसा नांगरणी करणे गरजेचे आहे.