पुणे, ता. 24 : विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात आरोपीची 15 वर्षानंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.ए.आय.पेरांपल्ली यांच्या कोर्टाने आरोपी विरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध नसल्याने आरोपीस निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले आहेत. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. नितीन भालेराव यांनी दिली.
राजदीप दिपक गायकवाड (रा. सोलापूर) असे निर्दोष मुक्त झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजदीप गायकवाड याचे मयत कोमल बरोबर मार्च 2009 साली सोलापूर येथे प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांत दोघे पुण्यात राहण्यास आले होते. लग्नानंतर आरोपी मयत कोमल हिस दारू पिऊन आई वडिलांकडून राशन भरण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी पैसे आणावेत अशी मागणी करीत होता. त्याचे म्हणणे नाही ऐकल्यास तिला सतत मारहाण करीत होता.
02 जानेवारी 2010 रोजी मयत कोमल आणि आरोपी यांच्यात परत भांडणे झाल्याने आरोपी घराबाहेर गेल्यावर कोमल हिने स्वतः घरातील स्टोव्ह मधील रॉकेल अंगावर टाकून पेटवून घेतले होते. कोमलचा उपचारादरम्यान ससून जळीत वार्डात 05 जानेवारी 2010 रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर मयताच्या आईने हवेली पोलीस ठाण्यात आरोपी राजदीप विरुद्ध कोमल हिस आत्महत्तेस प्रवृत्त करण्याची तक्रार दिली होती. आरोपी विरुद्ध हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते व तपासपूर्ण करून आरोपीविरुध दोषारोप पत्र दाखल केले होते.
सरकार पक्षातर्फे केसमधे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीतर्फे वकील नितीन भालेराव यांनी आरोपी हा घटनेच्या दिवशी कंपनीमधे कामास हजर होता. तसेच आरोपीचा प्रेमविवाह असून त्याने कधीच नातेवाईकांकडे पैसे मागितले नाहीत. आरोपी तथा मयत दोघेही स्वतः कमवत होते केवळ प्रेमविवाहाला मयत मुलीच्या आई वडिलांचा विरोध असल्याने व मयताच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून मयताने पोलिसांसमोर आरोपीचे नाव घेतल्याने आरोपी विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला होता. असा युक्तिवाद आरोपीपक्षातर्फे करण्यात आला.
दरम्यान, आरोपीपक्ष व सरकारपक्षाचा युक्तिवाद ऐकून व पुरावा पाहता पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आय.पेरांपल्ली यांच्या कोर्टाने आरोपी विरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध नसल्याने आरोपीस निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले. या कामात ॲड. स्वप्नील दाभाडे आणि ॲड. मीनाक्षी चव्हाण यांनी मदत केली.