न्हावरे,ता.29: “आम्ही कोणताही आदेश पाळणार नाही, रस्ता मोकळा करणार नाही, तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा असेल तो करा.” असे सांगून, तहसीलदारांनी रस्ता खुला करण्यासाठी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली. तसेच रस्ता खुला करण्यासाठी नकार देणाऱ्या शिरसगाव काटा(ता.शिरूर)येथील शेतकरी कुटुंबावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडू पोपट भोईटे, महेश पोपट भोईटे, ताराबाई पोपट भोईटे आणि दादा पोपट भोईटे (सर्वजण रा. शिरसगाव काटा, ता.शिरूर, जि. पुणे) यांच्यावर रस्ता खुला करण्यास विरोध केल्यामुळे शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसगाव काटाच्या कामगार तलाठी प्रमिला नागेश वानखेडे (वय 42, रा.खराडी बायपास, ता.हवेली, जि. पुणे) यांनी रस्ता खुला करण्यासाठी विरोध करणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (ता.28) सायंकाळच्या सुमारास शिरसगाव फाटा ते पिंपळसुटी हा रस्ता दळणवळणासाठी तात्पुरता खुला करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने आदेश काढला होता. मात्र, खंडू पोपट भोईटे यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यास नकार दिला. तसेच महसूल विभागाच्या आदेशाची पायमल्ली करून अवमान केला.
त्यामुळे शिरसगाव काटा येथील संपूर्ण भोईटे कुटुंबावर महसूल विभागाकडून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.