पुणे : महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित महिलेला लग्नास नकार देत पोलिस कर्मचाऱ्याकडून फसवणूक करण्यात आली आहे. महिलेसोबत नातं ठेवत तिच्या पतीच्या विमा पॉलिसीचे 5 लाख व सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार अनिल सुतार असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो खडक पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील फिर्यादी महिला त्यांच्या कुटुंबासह रास्ता पेठेत वास्तव्यास होत्या. 4 वर्षांपूर्वी तुषार सुतार याच्याबरोबर सोशल मीडियावरून त्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. फिर्यादी महिला व तुषार यांच्याबाबत पतीला कळल्यानंतर पतीकडून त्या महिलेला घराबाहेर काढण्यात आले.
तुषार व फिर्यादी महिला तिच्या मुलीसह सुमारे तीन वर्षे आंबेगाव येथे एकत्र रहात होते. त्यानंतर 2021 मध्ये फिर्यादी महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या पॉलिसीचे 9 लाख रुपये या महिलेला मिळाले. या पैशांपैकी तुषार याने वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून 5 लाख रुपये व 22 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन अपहार केला.
लग्नास नकार आणि महिलेला मारहाण
दरम्यान, फिर्यादी महिलेने तुषार यांच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता. त्याच्याकडून वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ करण्यात आली. काही काळानंतर सुतार यांनी तिला मारहाण व शिवीगाळ करुन लग्नास नकार दिला. अखेर तिने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यामुळं तुषार सुतार याचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी या कर्मचाऱ्याचे निलंबन केले आहे.