दौंड(पुणे): तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दत्तात्रय शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच गोरख शेळके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी दत्तात्रय शेळके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच पूनम बारवकर होत्या. ग्रामसेवक ज्ञानोबा काळे यांनी सभेचे कामकाज पहिले. निवडीप्रसंगी मावळते उपसरपंच गोरख शेळके, आप्पासो हंडाळ, संचालक भीमा पाटस कारखाना, धनाजी शेळके, किरण देशमुख माजी संचालक भीमा पाटस कारखाना, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, अशोक हंडाळ, मनोज होळकर, सचिन शेळके यांच्यासह आमदार राहुल कुल गटाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंच दत्तात्रय शेळके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश
केडगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणूकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केडगावमध्ये मोठे खिंडार पडले असून विद्यमान उपसरपंच व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजप तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला .
“आजपासून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य देणार असून सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विचारात घेऊनच काम करणार आहे. तसेच माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला उपसरपंच पदाची संधी दिल्याने ग्रामस्थांचे आभार मानतो. व आमदार राहुल कुल यांच्या कार्यशैलीला प्रभावित होऊन मी भाजपा प्रवेश केला आहे”.
– दत्तात्रय शेळके
(उपसरपंच केडगाव)