लोणी काळभोर, ता. 5: यवत पोलिस स्टेशनच्या संदर्भात सध्या सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत असून या लेटर बॉम्बने यवत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांसह अनेकांची झोप उडण्याची शक्यता, कडक शिस्तीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे डोळे उघडण्याची शक्यता आहे.
या पत्रात यवत पोलिस ठाण्यातील भ्रष्ट अधिकारी कुणाकडून किती हप्ता घेतात, तसेच खुनासारख्या गंभीर प्रकरणाला बिबट्याने मारले म्हणून कसे दाखवितात या सगळ्याच बाबी उजेडात आल्या आहेत. विशेष म्हणजे या निनावी पत्रात यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावरही थेट आरोप करण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मध्यंतरी वरवंड येथील महिलेचा खून झाला होता. मात्र त्याच्या तपासात बिबट्याकडून मृत्यू झाल्याचे दाखवून प्रकरण दडपले गेले. प्रत्यक्षात तो खून जवळील व्यक्तीनेच केल्याची पोलिसांच्या अंतर्गत तपासात चर्चा होती, त्याचाही उल्लेख या लेटर बॉम्बमध्ये आहे. याशिवाय एका गुन्ह्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यात तपास व्यवस्थित न केल्याचा ठपका संबंधित हवालदारावर ठेवून पोलिस अधीक्षकांनी त्याचे निलंबन केले. मात्र प्रत्यक्षात त्या आरोपपत्रावर पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या सह्या होत्या, त्यांना मात्र पाठीशी घातले गेल्याचा उल्लेख पत्रात आहे. यशिवाय पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे सामान्य नागरिकांशी व्यवस्थित व सौजन्याने न बोलता मोठ्याने ओरडून बोलतात, पण अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालतात असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान यवत पोलिस अधिकाऱ्यांना कुणाकडून किती हप्ता मिळतो? याचीही माहिती या पत्रात देण्यात आली असून त्यात हप्ते देणाऱ्या संबधितांची नावेही आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत.
मटका हप्ते देणारे:
गोटू पवार, यवत- ५ लाख रु., गौरव दोरगे, यवत- ५ लाख रु., बबन शिंदे, खामगाव गाडीमोडी – ५ लाख रु., रमेश मारकड, केडगाव चौफुला – ५ लाख रु., गफुरभाई शेख, केडगाव, ५ लाख रु., राजू भंडलकर, पाटस- ३ लाख रु., संतोष भोसले, राहू- २ लाख रु., निखिल दोरगे, देलवडी पिंपळगाव- २ लाख रु.
गावठी दारू हातभट्ट्या व हॉटेल- १० लाख रुपये, अवैध वाळू उपसा आणि वाळू वाहतूक – ५ लाख रुपये.
गुटखा व्यावसायिकांकडून
१. राजेंद्र मलभारे, यवत- २ लाख रु.
२. प्रशांत कदम, सहजपूर, २ लाख रु.
३. रेवन गोसावी, वरवंड, २ लाख रु.
४. मिराज शेख, वाळकी- १ लाख रु.
गुऱ्हाळावरील खराब कचऱ्याच्या गाड्यांकडून – ५ लाख रुपये
भंगार व्यावसायिक – ७ लाख रुपये
पाटस टोलनाका- १ लाख रुपये
पत्रातील आरोप बिनबुडाचे
हे सर्व आरोप बिनबुडाचे असून यामध्ये काहीही सत्यता नाही. सोशल मीडियावर कोणीही काहीही व्हायरल करू शकते. या प्रकरणाबाबत बोलायचे झाले तर कोणीतरी जाणूनबुजून हा खोडसाळपणा केलेला आहे. उलट यामधील एक गुन्हा आम्ही उघडकीस आणला आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच अवैध धंदे बंद आहेत. तुम्ही पडताळणी करू शकता.
– नारायण देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, यवत पोलिस स्टेशन