शिक्रापूर (पुणे) : गटाची शेतजमीन मोजणी करण्यासाठी व हद्द निश्चित करण्यासाठी शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक व खासगी व्यक्तीला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
शिवराज यशवंत बंडगर (वय २४, पद- भूकरमापक, भूमी अभिलेख कार्यालय, ता. शिरुर, जि. पुणे, वर्ग-३) व खासगी व्यक्ती अमोल विष्णू कदम (वय २७, रा. सरदवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) अशी रंगेहात पकडलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी एका ४३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार याची शेतजमिनीची हद्द कायम करण्यासाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय, शिरुर येथे रितसर अर्ज करुन त्यासाठी लागणारे शासकीय शुल्क भरले होते. शिवराज बंडगर हे धामारी येथे आल्यावर त्यांच्यासोबत असणारी खासगी व्यक्ती अमोल कदम यांनी तक्रारदारांकडे त्यांच्या दोन गटाची शेतजमीन मोजणी करण्यासाठी व हद्द निश्चित करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३ हजार रुपये देण्याचे ठरले होते. या प्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तेव्हा तक्रारदारांकडून शेतजमीन मोजणी करण्यासाठी व हद्द निश्चित करण्यासाठी तडजोडीअंती तीन हजार रुपयांची पंचासमक्ष मागणी करुन, अमोल कदम यांनी ३ हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली व शिवराज बंडगर यांनी आरोपी अमोल कदम याच्या लाच मागणीस व लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले, म्हणून त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, वरील दोन्ही आरोपींवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.