पुणे: पुणे (लोहगाव) विमानतळावर विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे आगामी पन्नास ते शंभर वर्षांचा विचार करून विस्तार होणार आहे. त्यामुळे यासाठी २०० एकर जागेची गरज लागणार आहे. त्यातील २५ एकर जमीन संरक्षण विभागाकडून घेण्यात आहे. तर ६५ एकर खासगी जागेचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. उर्वरित जागेसाठी चर्चा सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, २५ एकर जमिनीच्या बदल्यात संरक्षण विभागाला अन्यत्र जागा देणार आहे. विमानतळ धावपट्टीच्या विस्तारासाठी ओएलएस सर्व्हेनुसार सर्व विभागांसोबत बैठक घेण्यात येत आहे. या मागणीला सरंक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच, खासगी ६५ एकर जागेबाबत बोलणी सुरू आहे. जागा संपादनाचे काम राज्य सरकारचे आहे. शेजारचा रस्ता विमानतळ परिसरात येणार असल्याने पर्यायी रस्ता तयार करावा लागणार आहे. पणे महापालिका त्यासाठी ६५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तर उड्डाण योजनेंतर्गत छोटी शहरे मोठ्या शहरांना जोडली जात असून दोन वर्षांत देशभरात या योजनेंतर्गत दीड कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे.
विमानतळापर्यंत मेट्रो सेवेचा डीपीआर तयार होतोय
पुणेकरांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात शहराच्या कोणत्याही भागातून विमानतळापर्यंत येता यावे, यासाठी मेट्रोचे जाळे विमानतळापर्यंत जोडले जाणार आहेत. खडकवासला ते खराडी मेट्रो मार्ग पुढे विमानतळाला जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासंदर्भात महामेट्रोला डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेट्रो विमानतळासोबत जोडली जाणार आहे.
उड्डाण यात्री कॅफेत १० रुपयांना चहा मिळणार
लोहगाव विमानतळावरील उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन मुरलीधर मोहोळ यांनी केले. प्रवाशांना आता येथे पाणी, चहा, कॉफी, वडापाव स्वस्तात मिळणार आहे. या कॅफेमध्ये वडापाव २० रुपये, पाणी बॉटल १० रुपये आणि चहा १० रुपयाला मिळणार आहे. विमानतळामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला हा कॅफे असून २४ तास कॅफे खुला ठेवण्यात येणार आहे.