मुंबई : धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नवे नाव आणि चिन्ह निवडण्यास सांगितले होते. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय आयोगाकडे दिले होते. मात्र आता तीन चिन्हांमुळे पेच निर्माण झाला आहे.
आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडण्यासाठी उद्या दुपारपर्यंतचा वेळ दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय आयोगाकडे दिले होते.
निवडणूक आयोगाकडे जी चिन्हे आहेत त्यांच्या यादीत ठाकरेंनी मागितलेली चिन्हेच नाहीत.निवडणूक आयोगाकडे शिल्लक असलेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह ठाकरे गट किंवा शिंदे गट घेऊ शकतात. आता ठाकरे गटाने जी चिन्हे हवीत म्हणून निवडणूक आयोगाला सांगितले आहे त्यापैकी एकही चिन्ह त्या यादीत नाहीय.
आता काल निवडणूक आयोगाने जी यादी त्यांना दिली आहे त्यापैकी एक चिन्ह निवडावे लागणार आहे. आता यादीत नसलेलं चिन्ह ठाकरे गटाला कसं मिळणार? यादीत असलेलं कोणतं चिन्ह उद्धव ठाकरे घेणार? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावांचाही पर्याय उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगकडे पाठवलेल्या यादीत दिला आहे. त्यामुळे आता त्यांना आज कोणते चिन्ह आणि नाव मिळेल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाच्या नावासाठीही तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावासाठी शिंदे गटानेही मागणी केल्याचं समजते.
नव्या चिन्हासाठी आज निर्णय होणार आहे. तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या यादीत जी चिन्हे आहेत त्यातला पर्याय दोन्ही गटांसाठी उपलब्ध असेल. त्याऐवजी इतर कोणतं चिन्ह गटाला हवे असेल तर त्यासाठी आयोगाकडे विनंती करण्यात येईल. तशी मागणी आयोगाकडे केल्यास यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल.