राजेंद्र गुंड-पाटील
माढा : माढा तालुका व विधानसभा मतदारसंघात मागील सहा ते सात दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती, पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित द्यावी. अशी मागणी माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माढा तहसीलचे प्रतिनिधी अव्वल कारकून किरण जाधववर यांना आज बुधवारी (ता.१२) निवेदन दिले आहे.
यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, तालुका उपाध्यक्ष शहाजी चवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा शहराध्यक्ष दत्तात्रय अंबुरे,माजी नगरसेवक नागनाथ शिवपुजे,उत्तम पालकर, राजेंद्र गुंड,अशोक चव्हाण,सचिन चवरे,औदुंबर चवरे,आदित्य भांगे, संतोष पाडूळे,चिंचालीचे संतोष लोंढे, अजय नाईकवाडे,भिमराव चौधरी, रणजित देवकुळे,विकास पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,माढा मतदारसंघामध्ये मागील काही दिवसांमध्ये 100 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.अनेक भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस,केळी, पपई,डाळींब,द्राक्षे,पेरू,लिंबू, भूईमूग,तूर,उडीद, सोयाबीन,मूग, कांदा, टोमॅटो, मिरची,मका व पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पाझर तलाव,बंधारे,ओढे,नाले व शेततळी फुटुन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
दरम्यान, माढा तालुक्यात काही ठिकाणी रस्ते खचले आहेत तर काही ठिकाणी लहान-मोठे पूल वाहून गेले आहेत. सीना नदीच्या काठावरील शेकडो कृषीपंप पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांची पीके वाहून गेली आहेत तरी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे सरसकट पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी. खराब व नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी संबंधीतांना तातडीने सुचना देण्याची मागणीही केली आहे.