दीपक खिलारे
(Indapur News) इंदापूर : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करून ग्रामीण भागातील विविध क्षेत्रांशी संबंधित योग्य माहिती, ज्ञान, शिक्षण प्रसारित करण्यासाठी ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफ.एम. हे इंदापूर तालुक्यात शिक्षणाचे नवे दालन झाले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात ‘ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफएम’ या समुदाय आकाशवाणी केंद्राचे उद्घाटन रविवार दि. 26 मार्च रोजी झाले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ज्ञानवर्धिनी रेडिओ केंद्राचे उद्घाटन…!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेचे कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी विश्वनाथ काळे, आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे अधिष्ठाता प्रा. डॉ. भालचंद्र बाबुराव वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कुलगुरू डॉ. कारभारी विश्वनाथ काळे म्हणाले की,’ रेडिओ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून समाज विकासासाठी आवश्यक माहितीवर आधार अभ्यासक्रम तयार करणे काळाची गरज आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विज्ञान, तंत्रज्ञान व कला यावर आधारित कौशल्य तरुण पिढीमध्ये रुजावे यासाठी उपयोगी आहे. वेगवेगळे कौशल्य विकसित करून त्याचा उपयोग उत्पादन प्रक्रियेत होण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील आलेले बदल हे समाजविकासाठी व देश विकासासाठी महत्त्वाचे आहे.
डॉ. भालचंद्र वायकर म्हणाले की,’ तंत्रज्ञान व विज्ञान समाजातील समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त असावे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण क्षेत्रातील प्रयोग, संशोधन हे प्रयोगशाळेत पुरते मर्यादित न ठेवता ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचावे अशी व्यवस्था केली आहे. संशोधन हे नेहमी समाज उपयोगी ठरावे .शिक्षणावर केलेला खर्च हा गुंतवणूक मानला पाहिजे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच पाहुण्यांची त्यांनी ओळख करून दिली.
रेडिओ जॉकी रोहिणी कुचेकर यांनी ज्ञानवर्धिनी रेडिओ केंद्रात मान्यवरांची मुलाखत घेतली.
यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके,खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, संचालक विलास वाघमोडे, गणपत भोंग, पराग जाधव तसेच राजेंद्र पवार उपस्थित होते.
ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफएम केंद्राचे समन्वयक डॉ. संदिप शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभार मानले.