मथुरा : उत्तर प्रदेशच्या मथुरा-वृंदावनमधील एका युवकाने पोट दुखत असल्याने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजा बाबू असे या युवकाचे नाव आहे.
यूट्यूबवर शस्त्रक्रियेसंबंधीचे व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याने बाजारातून सर्जिकल ब्लेड, स्टीच कॉर्ड आणि सुई यासारख्या साहित्यांची खरेदी केली. यानंतर स्वतःचे पोट कापून ते शिवून टाकले. पण, प्रकृती बिघडल्यावर भाच्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी आग्रातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. पण, नंतर तो थेट घरी निघून गेला. आता त्याची प्रकृती ठीक असल्याचे समजते. राजा बाबूने पोटाचा वरचा भाग कापल्याने आतमधील अवयवांना काहीही झाले नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले.