उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भाजप नेत्याने आपली पत्नी आणि तीन मुलांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्या मुलाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. भाजप नेत्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. योगेश रोहिल्ला असं या भाजप नेत्याचं नाव आहे. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत मृत्यू झालेल्या तीनही मुलांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर दुसरीकडे पोलिस संरक्षणामध्ये भाजप नेत्याच्या पत्नीवर उपचार सुरू आहे.
अधिक माहिती अशी की, भाजप नेते योगेशच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. योगेश हा भाजपच्या सहारनपूर जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य आहे. योगेश रोहिल्ला मागील अनेक दिवसांपासून मानसिक दृष्ट्या आजारी होता अशी प्राथमिक माहीती समोर आली आहे. त्याने हे कृत्य का केलं यमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
स्वत:योगेश रोहिल्लाने घडलेला प्रकार शेजाऱ्यांना जाऊन सांगितला. आपणच आपल्या तीन मुलांवर आणि बायकोवर गोळीबार केल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे, मात्र योगेशने हत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून अधित तपास सुरू आहे.