नवी दिल्ली: अमेरिकेत अवैधरीत्या प्रवेश केलेल्या आणखी ४८७ भारतीयांना मायदेशी पाठवणार असल्याचे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लवकरच विशेष विमानाने या भारतीयांना अमेरिकाबाहेरचा रस्ता दाखवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भारतीयांना सन्मान न देता त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा मुद्दा उचलून धरणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध शरणार्थीना देशाबाहेर काढण्याचा धडाका लावला आहे. यामध्ये भारतीयांचाही समावेश असून, बुधवारी अमेरिकेतून १०४ भारतीय मायदेशी (अमृतसर) परतले आहेत. आता आणखी ४८७ भारतीयांना अमेरिकेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याबाबत ट्रम्प प्रशासनाने तसे आदेश दिले असून, लवकरच त्यांची घरवापसी होणार आहे. मात्र ट्रम्प प्रशासनाने केवळ २९८ जणांची माहिती दिली आहे, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.
भारतीयांना मायदेशात आणण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शवली आहे. परंतु, या प्रक्रियेदरम्यान त्यांच्याशी कोणतेही गैरवर्तन केले जाऊ नये व त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात येऊ नये, असेही मिस्त्री यांनी ठणकावले आहे. भारतीयांना बेड्या घालून लाजीरवाणी वागणूक दिल्याचा मुद्दा ट्रम्प प्रशासनापुढे उचलून धरणार आहोत. भविष्यात असा प्रकार घडू नये व भारतीयांना सन्मानाने मायदेशी रवाना करावे, अशी भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.