मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप रविवारी 17 मार्च रोजी मुंबईमधील छत्रपती शिवाजी पार्कवर झाला.या सभेला इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. आमची लढाई कोणत्याही एका पक्षाविरोधात किंवा व्यक्तीविरोधात नाही. आम्ही एका शक्तीविरोधात लढत आहोत, ज्या शक्तीने देशातील सर्व केंद्रीय संस्था आपल्या मुठीत ठेवल्या आहेत, अशी खरपूस टीका राहुल गांधी यांनी केली.
आज देशातील प्रमुख मीडियासह सोशल मीडियावरही या शक्तीचे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आहे. अमेरिकेतील कंपन्यांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळेच आम्ही विविध पक्षातील नेते एकत्र आलो आहोत. आम्ही सर्व एका पक्षाविरोधात आणि नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तिविरोधात लढत आहोत. सध्याच्या राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, देशातील प्रत्येक सरकारी संस्थेत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.