वसई : वसईमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. वसई पूर्वेतील मधुबन परिसरात शनिवारी रात्री भीषण अपघात झाला असून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा स्मार्ट सिटीजवळ मुख्य रस्त्यावर घडली. दोन मोटर सायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.
रात्री आठच्या सुमारास वसईतील मधूबन परिसरात शनिवारी (22 फेब्रुवारी) रात्री भरधाव वेगात असलेली एक्टिवा गाडी तसेच एक दुचाकी समोर समोर धडकल्याने हा अपघात झाला असून त्यामध्ये गाडीवर बसलेले तीन जण जागीच ठार झाले . अपघात झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा सुरु असून दूर्घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस आणि स्कूटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वालीव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.