मुंबई: महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघावरुन मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. सांगलीच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच नाराज झाले होते. यंदाच्या लोकसभेसाठी सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी परस्पर आपला उमेदवार दिल्याने पेच निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून बुधवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीतही सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांचे नाव होते. त्यामुळे आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी थेट दिल्लीमध्ये जात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सांगली मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघाबाबतची आपली बाजू हायकमांडसमोर मांडल्यानंतर आपण याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलू, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. या भेटीनंतर अवघ्या काही तासांमध्ये उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेते उपस्थित राहणार आहेत.