मुंबई : राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता या योजनेवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. लोकसभेतील पराभवानंतर राज्य सरकारला लाडका भाऊ आठवला का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बहिण घर सांभाळते तीचं दीड हजारात काय होणार, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच आहेत म्हणत भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला आहे.
लाडकी बहिण योजनेवर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, लोकसभेतील पराभवानंतर यांना लाडका छोटा भाऊ आठवू लागला आहे. त्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल आमचा विरोध नाही. खर तरं बहिणीला जास्त मदत मिळायला हवी. बहिण घर चालवत असते, स्त्री पुरूष समानता असायला हवी. दिड हजारात काय होतंय?, किमान 10 हजार तिलाही द्यायला हवेत. परवा सगळे लाडके भाऊ भरतीसाठी जमा झालेले पाहायला मिळाले. भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी असे राऊत म्हणाले.
भुजबळांबाबत काय म्हणाले राऊत?
छगन भुजबळांवर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. येत्या काळात कळेलच पवार साहेब काय आहेत. भुजबळ मोठे कलाकार आहेत. त्यांनी सिनेमातही कामं केलं, ते नाट्य देखील निर्माण करतात. छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच आहेत. विधानसभेच्या जागावाटपाचं काहीही ठरलेलं नाही. असही राऊत यांनी सांगितले.