प्रत्येकाला आपलं वैवाहिक जीवन सुखी असावं असं वाटत असतं. पण काही अशा गोष्टी असतात त्या मतभेद निर्माण करतात. परिणामी, पती-पत्नीमध्ये भांडणं होत असतात. लग्नापूर्वी पाहिलेली वैवाहिक जीवनाची अनेक स्वप्नं नंतर भंग होतात. त्यामुळे पती-पत्नीने एकमेकांच्या गरजा आणि भावना समजून घेऊन शहाणपणाने वागणे गरजेचे बनते.
जोडीदाराचे ऐकून घेऊन समजून घ्या
पती-पत्नी दोघांनीही हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही मुद्द्यावर तुम्ही नेहमी बरोबर असालच असे नाही. त्यामुळे कुणाचे काही ऐकून आपसात भांडणे योग्य नाही. प्रथम तुमच्या जोडीदाराचे पूर्ण ऐका आणि मगच कोणताही निर्णय घ्या. वैवाहिक जीवन नीट चालवायचे असेल तर मुद्दा कोणताही असो त्याच्या तळाशी जाणे अत्यंत आवश्यक आहे.
भावना समजून घ्या
जर तुमचा जोडीदार तुम्हाला काही बोलत असेल तर तुम्ही त्याच्या/तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काहीवेळा आपण आपल्या भावना आपल्या जोडीदारासोबत नीट शेअर करू शकत नाही. त्यामुळे कोणताही विषय असो किंवा कोणताही मुद्दा असो, आरामात बसून एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
एकमेकांचा आदर-सन्मान महत्वाचा
वैवाहिक जीवन सुरळीत चालण्यासाठी दोघांनीही एकमेकांचा मनापासून आदर करणे महत्त्वाचे आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा दोघांच्याही मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष नसेल. जर तुमच्या जोडीदाराशी संबंधित एखादी गोष्ट तुम्हाला आतून त्रास देत असेल तर त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी नक्कीच बोला. हे लक्षात ठेवा की आपण आपल्या जोडीदाराशी बोलत असताना, आपले मन पूर्णपणे शांत ठेवा.
एकमेकांचं कौतुक करा
वेळोवेळी एकमेकांची स्तुती, कौतुक केल्याने परस्पर प्रेम वाढते. कोणत्याही गोष्टीमध्ये पती अथवा पत्नी दुखावली जाईल असे करू नका. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जरी आपसांत काही गोष्टींमध्ये पटत नसलं तरी एकमेकांचा आदर, सन्मान, कौतुक करा. असे केल्यास दोघांमधील प्रेम आणखी घट्ट होण्यास फायदेशीर ठरू शकते. परिणामी, वादही टाळता येऊ शकतो.