अजित जगताप
वडूज : हिंदू धर्मातील उत्सवाचा राजा असा मान लाभलेल्या श्री गणरायाच्या आगमनाने घरोघरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वडूज ता खटाव नगरीत कोणताही त्रास होऊ नये म्हणून परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय मानला जात आहे.
गेली दोन वर्षे कॊरोना संकटाने सर्व संदर्भ बदलून गेले होते. या संकटसमयी जिल्हा प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणी केली होती. काही ठिकाणी नियमांचे पालन न झाल्याने कारवाई करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी श्री गणरायाच्या कृपेने सर्व सुरळीत झाले आहे. त्यामुळे घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चढाओढ लागल्याचे पाहण्यास मिळत आहे.
बहुतांश मंडळांनी सायंकाळी श्री ची प्रतिष्ठापना करण्याचे योजिले आहे. तसेच परिसरातील वाढलेले गवत नष्ट करण्यासाठी तण व किटकनाशक फवारणी केली आहे. युवा कार्यकर्त्यानी स्वतः हातात फावडे तसेच फवारणी यंत्रणा पाठीशी घेऊन सामाजिक कार्यात झोकून दिले आहे.
भागोदय गणेशोत्सव, वडूज ता खटाव यांच्या वतीने मान्यवर कार्यकर्त्यानी मंडप उभारणी पासून ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना करेपर्यंत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. यामध्ये सुरज तथा कृणाल गडांकुश, देवानंद थोरात, शुभम रामुगडे, सुरज पोतदार,नवीन दीक्षित,मुकुंद माने व इतर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, खटावचे माजी तहसिलदार विलास गडांकुश यांचे ही या भाग्योदय मित्र मंडळाला वेळच्यावेळी मार्गदर्शन लाभत आहे. गेली सव्वीस वर्षे मंडळ कार्यरत आहे. अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे.