Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : परंपरेनुसार उरुळी कांचनचे (ता. हवेली) ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या मंदिरात पालखीचा विसावा थांबून पुढे यवत साठी मार्गस्थ करावा. जर पालखी मंदिरात विसाव्यासाठी नाही आली तर पालखी सोहळ्याच्या समोर पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा सरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन येथे येणार का नाही याबाबत अजूनही नागरिकांमध्ये शंका आहे. (Will Sant Tukaram Maharaj Palkhi Sohola Come To Uruli Kanchan To Rest?)
काही वर्षापासून पालखी सोहळा गावात आणण्यास दिला जात आहे नकार
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. १०) जूनला प्रस्थान होणार आहे. गुरुवारी १५ जूनला सकाळी लोणी काळभोर येथून निघून यवत मुक्कामी जाणार आहे. (Uruli Kanchan News) शुक्रवारी (ता. १६) दुपारी विसाव्यासाठी परंपरेप्रमाणे उरुळी कांचनचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात येत असतो. परंतु गेल्या काही वर्षापासून पालखी सोहळ्याचे विश्वस्तांच्या विसंवादाने हा पालखी सोहळा गावात आणण्यास नकार दिला जात आहे.
मागील वर्षी अंतिम क्षणी तडजोडीतून पालखी सोहळा गावात येऊन काळभैरवनाथ मंदिरात विसावा घेऊन मग पुढे गेला आहे. परंतु यावर्षी पालखी सोहळा विश्वस्तांनी उरुळी कांचन गावात पालखी जाणार नाही. सरळ पुणे सोलापूर रोडवरच अपुऱ्या जागेत विसावा घेऊन तिथून पुढे मार्गस्थ होणार आहे, अशी भूमिका घेतली. (Uruli Kanchan News) यावरून उरुळी कांचनचे ग्रामस्थ व पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे सहकारी यांच्यामध्ये हवेलीचे प्रांत संजय आसवले यांच्या कार्यालयात एक बैठक झाली. परंतु या बैठकीतून अद्याप तरी काहीही मार्ग निघालेला नाही.
दरम्यान, पालखी सोहळा प्रमुखांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जर पालखी विसाव्यासाठी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात नाही आली तर पालखी सोहळ्याच्या समोर उरुळी कांचन येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Uruli Kanchan News) यामधून जर कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी पालखी सोहळा प्रमुख व त्यांचे सहकारी जबाबदार राहतील, अशी भूमिका नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत स्पष्ट करण्यात आली आहे.